
विनय आपटे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत 25 वर्षांखालील गटात पूर्वा जळगांवकर यांचा ‘बराबर है’ आणि 25 वर्षांवरील वयोगटात अभिजीत झुंजारराव यांच्या ‘मिरग’ या लघुपटाने प्रथम पारितोषिक पटकावले. यंदा तब्बल 51 लघुपटांनी स्पर्धेत भाग घेतला.
नवोदितांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्पर्धा भरवण्यात येते, असे वैजयंती आपटे यांनी सांगितले. यंदाच्या स्पर्धेत 25 वर्षांखालील वयोगटात दुसरा क्रमांक मल्हार कुलकर्णी यांच्या ‘फिरकी’ आणि तिसरा क्रमांक अन्विता वैद्य यांच्या ‘सुपर हीरो’ या लघुपटास मिळाला. 25 वर्षांवरील वयोगटात दुसरे पारितोषिक अभिजीत श्वेतचंद्र यांच्या ‘बेचकी’ लघुपटास तर तिसरे पारितोषिक अक्षय वासकर यांच्या ‘शाहीस्त्या’ लघुपटास मिळाले.
साठ्ये महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पारितोषिकप्राप्त लघुपट दाखवण्यात आले. स्पर्धेसाठी प्रतिमा कुलकर्णी, पुरषोत्तम बेर्डे, रोहिणी निनावे, भक्ती मायाळू, राजन वाघदरे आणि भरत दाभोळकर यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. साठ्ये महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या परितोषिक वितरण सोहळ्याला अभिनेते सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर आणि सुनील बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.