
विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर बांगलादेशात ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुन्हा अराजक निर्माण झाले असून संतप्त जमावाने इशनिंदेचा कांगावा करत एका हिंदू तरुणाला जिवंत जाळले. दोन वृत्तवाहिन्या, अवामी लीगचे कार्यालयही दंगेखोरांनी पेटवले. अनेक इमारती आणि वाहनांना आगीच्या हवाली करण्यात आले. दरम्यान, हादीच्या हत्येतील प्रमुख मारेकरी हिंदुस्थानात पळाल्याचा आरोप झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी लष्कर सतर्क झाले आहे.
2024मध्ये तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात उठाव करणाऱया विद्यार्थी नेत्यांपैकी एक तसेच इन्कलाब मंचचे नेते शरीफ उस्मान हादीवर 12 डिसेंबर रोजी ढाका येथे प्रचार सभेत गोळी झाडण्यात आली. हादीला सिंगापूर येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही बातमी धडकताच बांगलादेशात हिंसाचार सुरू झाला. हादीचा मृतदेह आज सिंगापुरातून ढाक्यात आणण्यात आला.
त्यानंतर ढाका शहरात दंगेखोरांनी प्रचंड हैदोस घातला. बांगलादेशातील सर्वाधिक खपाचे वृत्तपत्र डेली स्टार आणि प्रोथोम आलोचे कार्यालय पेटवून देण्यात आले. या कार्यालयात काम करणाऱया पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले.
गृह खात्याच्या सल्लागाराचे घर पेटवले
ढाक्यातील जातीय छात्र शक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेश गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या घराला आग लावली. तसेच प्रोथोम अलो या वृत्तपत्राचे कार्यालयही पेटवून दिले. संतप्त आंदोलकांनी आधी इमारतीला घेराव घातला आणि त्यानंतर आग लावली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना आणि आवामी लीगविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मोहंमद युनूस यांनी बोलावली बैठक
बांगलादेशाचे राष्ट्रप्रमुख मोहंमद युनूस यांनी कालच्या हिंसाचारानंतर तातडीची बैठक बोलावली. त्यानंतर राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी देशात हिंसेला कोणतेही स्थान नसल्याचे सांगितले. भालुका येथे घडलेल्या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींना सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
हिंदू तरुणाची हत्या, झाडाला लटकवून पेटवून दिले
ढाक्यापासून जवळच असलेल्या भालुका येथे इशनिंदेचा आरोप करत संतप्त जमावाने दीपूचंद्र दास या हिंदू तरुणाला अक्षरशः तुडवले. त्यानंतर जमावाने त्याला अर्धमेल्या अवस्थेत झाडाला लटकवून पेटवून दिले. दीपूचंद्र एका कारखान्यात कामाला होता. तेथे एका कार्यक्रमात त्याने इस्लामबद्दल अपशब्द वापरल्याचा त्याच्यावर आरोप होता.
- विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादीच्या मृत्यूनंतर देशभरात हिंसाचार
- शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे कार्यालय, गृह सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांचे घर पेटवले
- प्रोथोम अलो, डेली स्टार पेपरचे कार्यालय जाळले
- जमावाच्या हिंदुस्थानविरोधी घोषणा
- हिंदू तरुणाची हत्या, झाडावर लटकवून पेटवून दिले
- हादीवर हल्ला करणारे हिंदुस्थानात लपल्याचा आरोप
- हिंदुस्थानच्या सहाय्यक उच्चायुक्तांच्या निवासस्थानावरही हल्ला

























































