
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या आईची सुमन मंदाना यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या क्लिपमध्ये रश्मिकाच्या अभिनेता रक्षित शेट्टी याच्याशी असलेल्या पूर्वीच्या नातेसंबंधाबाबत काही आरोप केल्याचे म्हटले जात आहे. ही क्लिप समोर आल्यानंतर रश्मिकाने ही क्लिप ताबडतोब हटवण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही तिने स्पष्ट केले आहे.
— Rashmika Mandanna (@iamRashmika) March 12, 2026
यावर्षी २६ फेब्रुवारीला रश्मिकाचे अभिनेता विजय देवेरकोंडा याच्याशी लग्न झाल्यानंतर काही आठवड्यांनी ही ऑडिओ क्लिप पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र अहवालांनुसार ही क्लिप सुमन मंदाना यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी दिलेल्या एका कन्नड मुलाखतीतील असल्याचे सांगितले जात आहे. रश्मिका आणि रक्षित शेट्टी यांची पहिली भेट किरिक पार्टी या २०१६ मधील कन्नड चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. नंतर २०१७ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला. मात्र २०१८ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सुमन मंदान्ना यांनी त्या काळातील दोन्ही कुटुंबांमध्ये झालेल्या मतभेदांबद्दल बोलल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या मते, साखरपुड्यानंतर कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला. तसेच रक्षित काही निर्णयांवरून वाद घालत असे. त्याचबरोबर रश्मिकाच्या करिअरच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत होता
तसेच गिता गोविंदम या चित्रपटाची ऑफर मिळाल्यानंतर रश्मिकाने अभिनय सोडणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही या क्लिपमध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर रश्मिकाने सोशल मीडियावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले. तिने म्हटले की, “जवळपास आठ वर्षांपूर्वीचे एक खाजगी संभाषण परवानगीशिवाय रेकॉर्ड करून आता संदर्भाबाहेर प्रसारित केले जात आहे. हे माझ्या गोपनीयतेवर गंभीर आक्रमण आहे.” तिने पुढे सांगितले की गेल्या आठ वर्षांपासून तिच्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जात आहे. ही क्लिप वाद निर्माण करण्यासाठी मुद्दाम प्रसारित केली जात आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाला अनावश्यकपणे यात ओढले जात आहे
रश्मिकाने सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, इन्फ्लुएन्सर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना २४ तासांत ही क्लिप आणि संबंधित पोस्ट हटवण्याचे आवाहन केले आहे. तिने स्पष्ट केले की, आदेश पाळला नाही तर बदनामी आणि गोपनीयतेचे उल्लंघन या आरोपांखाली कायदेशीर नोटीस पाठवली जाईल.

























































