
लग्न म्हटलं की महागडे कपडे, खाणे-पिणे, मंडपाची सजावट यासह अनेक अशा गोष्टी आहेत त्यासाठी वधू आणि वर हे आवर्जून लक्ष देत असतात. परंतु, एका जोडप्याने या सर्व गोष्टींना बाजूला सारून एक नवी लग्नाची पद्धत समाजापुढे ठेवली आहे. एका नववधूने आपल्या लग्नात शून्य कचरा मोहीम राबविली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शून्य-कचरा विवाह सोहळा कसा साजरा केला. हे दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांच्या लग्नसोहळ्याची झलक दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये सजावटीपासून खाण्या-पिण्यापर्यंत प्रत्येक लहान-मोठय़ा गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. ज्यामुळे कमीत कमी अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
झीरो वेस्टेजची चर्चा
या लग्नात, पाहुण्यांचे स्वागत ज्यूटच्या पिशव्यांमध्ये भेटवस्तू देऊन करण्यात आले. हात धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी झाडांच्या दिशेने वळवले गेले होते. ज्यामुळे वापरलेल्या पाण्याने आजूबाजूच्या झाडांना पाणी मिळाले. लग्नाचे मुख्य आकर्षण होते ते उसाच्या देठापासून बनवलेला मंडप. लग्न समारंभानंतर उसाची रचना गाईंना चारा म्हणून पुन्हा वापरण्यात येणार आहे. लग्नसमारंभात डिस्पोजेबल कप आणि प्लेट्सची जागा पारंपरिक केळीची पाने आणि मजबूत स्टीलच्या ग्लासांनी घेतली.