Virat Kohli Retires : एका युगाचा अंत झाला, कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीच्या योगदानासाठी BCCI ने मानले आभार

हिंदुस्थानचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. कोहलीने सोमवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत याबाबत माहिती शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, “कसोटी क्रिकेटने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आहे, असे धडे शिकवले आहेत, जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेन.”

कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने केलेल्या कामगिरीचे कौतुक करत बीसीसीआयने विराट कोहलीचे आभार मानले आहेत. बीसीसीआयने X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “कसोटी क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला, पण वारसा कायम राहील. टीम इंडियासाठी त्याने दिलेले योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.”

दरम्यान, कोहलीने 10 मे रोजी बीसीसीआयला सांगितले होते की, तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छितो. बोर्डाने कोहलीला त्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराटची कामगिरी चांगली नव्हती. या मालिकेत त्याने 23.75 च्या सरासरीने धावा केल्या. 8 पैकी 7 वेळा तो ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूवर बाद झाला. कोहलीने बीजीटीमध्ये 9 डावात 190 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचा समावेश होता. विराट कोहलीने 123 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतके झळकावली. विराटने 7 द्विशतके ठोकली. 2017 आणि 2018 मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले होते.