
हॉलिवूडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 98 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा केवळ चित्रपटांचीच नव्हे, तर जागतिक युद्धाचीही चर्चा रंगली. प्रसिद्ध स्पॅनिश अभिनेता जेवियर बार्डेम याने जागतिक शांततेचे आवाहन करत पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला. विशेष म्हणजे, ज्यावेळी बार्डेमने हे विधान केले, त्यावेळी हिंदुस्थानची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा त्याच्यासोबत मंचावर उपस्थित होती.
जेवियर बार्डेम आणि प्रियांका चोप्रा हे दोघे ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीतील पुरस्कार देण्यासाठी मंचावर आले होते. पुरस्काराची घोषणा करण्यापूर्वी बार्डेमने माइकवरून ठामपणे सांगितले, “युद्धाला आमचा नकार आहे, पॅलेस्टाईन मुक्त करा!”. त्याच्या या विधानाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यावेळी प्रियांका चोप्राने स्मितहास्य करत आणि मान डोलावली.
बार्डेमने केवळ भाषणातूनच नव्हे, तर आपल्या पेहरावातूनही निषेध व्यक्त केला. त्याने आपल्या टक्सिडोवर ‘नो आ ला गुएरा’ (No a la guerra – युद्धाला नकार) लिहिलेली एक पिन आणि पॅलेस्टिनी जनतेशी एकता दर्शवणारी ‘हंडाला’ ही पिन लावली होती. बार्डेमने यापूर्वी 2003 मध्ये इराक युद्धाच्या विरोधातही अशाच प्रकारे ऑस्करच्या मंचावर निषेध नोंदवला होता.
“No to war and Free Palestine” #Oscars pic.twitter.com/YR6g6QDHPR
— State of Palestine (@Palestine_UN) March 16, 2026
या सोहळ्यासाठी प्रियांका चोप्राने ‘डिओर’ या ब्रँडचा पांढऱ्या रंगाचा स्टायलिश गाऊन परिधान केला होता. रेड कार्पेटवर तिने पती निक जोनाससोबत एन्ट्री घेतली. प्रियांका आणि बार्डेम यांनी नॉर्वेच्या ‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार प्रदान केला. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर, ऑस्करसारख्या मोठ्या मंचावर बार्डेमने घेतलेली ही भूमिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे.


























































