उत्तर प्रदेशात संतांचा आणि जनतेचा आवाज दाबला जातोय, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या भेटनंतर अखिलेश यादव यांचं वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची भेट घेतली. लखनौमध्ये झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, अखिलेश यादव यांनी यावेळी उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे सध्या विविध धार्मिक आणि सामाजिक मुद्द्यांवरून चर्चेत आहेत. त्यांच्या भेटीनंतर अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच प्रशासकीय निर्णयांवरून सरकारला घेरले. “राज्यात संतांचा आणि जनतेचा आवाज दाबला जात आहे. अध्यात्म आणि धर्माचा केवळ राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात आहे,” असा आरोप यादव यांनी यावेळी केला.

अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर टीका करताना म्हटले की, उत्तर प्रदेशात सामान्य जनतेपासून ते धार्मिक गुरूं पर्यंत कोणाचेही ऐकले जात नाही. सरकार केवळ स्वतःच्या अजेंड्यावर काम करत आहे आणि लोकशाही मूल्यांकडे दुर्लक्ष करत आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांना त्यांनी पाठिंबा दर्शवत, भाजपची कार्यपद्धती राज्यासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे.