
ठाण्यातील शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची कथित शिवराळ ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज शिंदे गटाच्या कळवा भागातील उमेदवार प्रियांका पाटील यांनी मतदारांना उर्मट भाषेत दमबाजी केल्याची घटना विटावा परिसरात घडली. प्रियांका पाटील यांना स्थानिक मतदारांनी अडवून पाच वर्षे कुठे होतात? कोणता विकास केला? असा जाब विचारला तेव्हा पाटील यांनी ‘अरे, जा दुनियेला सांगा.. आणि ‘नोटा’ला मतदान करा.., आम्ही आमच्या जीवावर निवडून येऊ’ अशी दर्पोक्ती केली. समाजमाध्यमांवर हा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शिंदे गटाचे उमेदवारांना स्थानिक रहिवासी त्यांना विकासकामांचा जाब विचारत आहेत. गेल्याच आठवड्यात लोकमान्यनगर येथील प्रभाग क्रमांक 14 मध्ये शिंदे गटाचे उमेदवार दिलीप बारटक्के, कांचन चिंदरकर, आशा डोंगरे व राकेश शिंदे प्रचाराला गेले असता त्यांना स्थानिक मतदारांनी अडवून विकासाच्या मुद्यावर जाब विचारला.
काय विकासकामे केलीत दाखवा?
कळवा येथील शिंदे गटाच्या उमेदवार प्रियांका पाटील या विटावा, भोलानगर, आनंदनगर, गणपतीपाडा या भागात प्रचाराला गेल्या. त्यांना नागरिकांनी अडवून तुम्हाला गेल्या वेळी आम्ही निवडून दिले, पण पाच वर्षांत तुम्ही इथे फिरकला नाहीत.. तुम्ही आमच्यासाठी काय विकासकामे केलीत ते दाखवा, असा जाबच मतदारांनी त्यांना विचारला. त्यावेळी संतापाचा तिळपापड झालेल्या प्रियांका पाटील यांचा तोल सुटला आणि त्यांनी ‘जा.. मला मत देऊ नका असे दुनियेला सांगा, माझ्याविरोधात ‘नोटा’ ला मतदान करा.. मी माझ्या जीवावर निवडून येईन’ अशी दमबाजी केली.





























































