विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीतही मतचोरी, साहित्य वर्तुळात खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भ साहित्य संघाच्या 20 वर्षांनी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागले असून गडचिरोलीच्या आरमोरी येथे मतदारांच्या मतपत्रिका परस्पर पळवून बोगस मतदान करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक मतदारांनी आरमोरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश गांधी, टपाल विभागाचे कर्मचारी आणि संबंधित उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे साहित्य वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

देशात मतचोरीचा मुद्दा गाजत असताना साहित्य क्षेत्रातही मतचोरी झाल्याचे सिद्ध झाले आहे. गिरीश गांधी, प्रदीप दाते, डॉ. रवींद्र शोभणे, श्रीपाद जोशी अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहेत. गिरीश गांधी मला आता सामाजिक सेवेतून निवृती घ्यायची असल्याचे सांगत असताना अचानक निवडणुकीत उतरले आहेत. त्यांच्यासाठी भाजपचे कार्यकर्ते काम करीत आहेत.

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीसाठी आरमोरी येथील मतदारांच्या 10 मतपत्रिका ‘स्पीड पोस्ट’ने पाठवण्यात आल्या होत्या. मात्र या मतपत्रिका संबंधित मतदारांना वितरित न करता त्या परस्पर एका त्रयस्त व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात आल्या. आरमोरीच्या पोस्ट मास्तरांनी यासंदर्भात लेखी कबुली दिली असून संबंधित पोस्टमनने कोणाच्या तरी दबावाखाली किंवा प्रलोभनाला बळी पडून हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या या 10 मतपत्रिकांपैकी चार मतपत्रिकांवर आधीच बोगस मतदान करून त्या मतपेटीत टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे संघटित कारस्थान असल्याचा आरोप तक्रारदार डॉ. महेश कोपुलवार आणि विजयकुमार ठवरे यांनी केला आहे. मतपत्रिकांचा हा गट्टा अध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश गांधी यांच्या कार्यालयातून नरेश गडेकर नामक व्यक्तीने मतदानासाठी पोहोचवला असल्याची कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरमोरी पोलिसांनी या प्रकरणी संबंधित पोस्टमनला तातडीने निलंबित करावे आणि या गुह्यात सामील असलेल्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.