व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप हेल्पलेस, सप्टेंबर 2006 नंतरची जन्मतारीख हलेना डुलेना; लाखो तरुणांची ऑनलाइन मतदार नोंदणी रखडली

नवमतदारांना घरच्या घरी मतदार नोंदणी करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने तयार केलेला व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप आता पूर्णपणे हेल्पलेस झाला आहे. या अ‍ॅप्समधून ज्या तरुणांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे किंवा 18 वर्षे पूर्ण होण्यास काही महिन्यांचा कालावधी आहे, त्यांना नोंदणी करता येते. मात्र सध्या या अॅपमधील जन्मतारीख 1 ऑक्टोबर 2006 च्या पुढे हलत-डुलत नसल्याने लाखो तरुणांची मतदार नोंदणी रखडली आहे. वारंवार प्रयत्न करूनही मतदार यादीत नाव नोंदविले जात नसल्याने तरुणांमध्ये नाराजी पसरली आहे.

मतदार नोंदणीमध्ये गतिमानता येण्यासाठी निवडणूक आयोगाने व्होटर हेल्पलाइन अ‍ॅप सुरू केला आहे. या अ‍ॅपमुळे नागरिकांना मतदार यादीमध्ये आपल्या नावात असलेल्या चुकांची सुधारणा करता येते. ज्या तरुणांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले आहे किंवा 18 वर्षे पूर्ण करण्याकरिता काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे, त्यांना मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून घरी बसूनच मतदार नोंदणी करता येते.

आवश्यक असलेली कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर या नवमतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट होतात. त्यामुळे बहुतेक तरुण मतदार नोंदणीसाठी याच अ‍ॅपचा वापर करतात. मात्र हा अॅप सध्या निष्क्रिय ठरला आहे. या अ‍ॅपमधील जन्मतारखेचा रकाना 1 ऑक्टोबर 2006 च्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यानंतर जन्म झालेल्या तरुणांना या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदार नोंदणी करता येत नाही.

सुरुवातीला सहा रकाने भरल्यानंतर नवमतदारांना छायाचित्र अपलोड करावे लागते. त्यानंतर जन्मतारखेचा रकाना येतो. तिथे आल्यानंतर मात्र अनेकांची निराशा होते.
या रकान्यामधील जन्मतारीख ही 1 ऑक्टोबर 2006 च्या पुढे जात नाही. त्यामुळे त्यानंतर जन्म झालेल्या तरुणांचा अर्ज तिथेच थांबतो. त्यांनी भरलेल्या सहा रकान्यांवर अक्षरशः पाणी फिरले जाते.
वयाची 18 वर्षे पूर्ण करण्यासाठी काही महिने बाकी असले तरी तरुणांना मतदार नोंदणी करता येते, असे आयोगाने याच अ‍ॅपमध्ये नमूद केले आहे. मात्र त्यासाठी अॅपमध्ये कोणताही रकाना ठेवण्यात आलेला नाही.

या अ‍ॅपमध्ये एकूण दहा रकाने आहेत. त्यामध्ये अधिवास आणि अन्य पुराव्यांसह छायाचित्र अपलोड करावे लागते. सुरुवातीचे सहा रकाने भरताना कोणतीही अडचण येत नाही.

सप्टेंबर 2006 नंतर जन्मलेल्या तरुणाचे वय 18 वर्षे 10 महिने
ज्या तरुण आणि तरुणींचा जन्म सप्टेंबर 2006 नंतर झाला आहे, त्यांचे वय आता 18 वर्षे 10 महिन्यांच्या आसपास गेले आहे. मात्र व्होटर हेल्पलाईन अॅपवर 1 ऑक्टोबर 2006 नंतरची जन्मतारीख दाखवली जात नसल्याने त्यांना मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करता येत नाही. हीच परिस्थिती कायम राहिली तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या तरुणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे.