
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याभोवती गिधाडे घिरट्या घालायला लागली आहेत. त्यांच्यावर आता लक्ष ठेवावे लागेल. अजितदादांसोबत न दिसणारी गिधाडे आता दिसू लागली आहेत. सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या या ढेकणांवर लक्ष ठेवावे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काही अडचणीमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीनं उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असावं, पार्थ आणि जय पवार यांना दादांनी काही सल्ला दिला असेल तर त्याचं त्यांनी पालन करावं. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल त्यांनी सांगितलं की, यात काही राजकारण किंवा तसं काही असेल तर त्याची चौकशी होईल. माझ्या घातपात प्रकरणातही एसआयटी तपासाची मागणी करणार. माझ्या घातपात प्रकरणात तपास अहवालाचं काय झालं, असा सवाल त्यांनी केला.
विरोधी पक्ष आता प्रबळ व्हायला हवे. पवार कुटुंब असो की ठाकरे कुटुंब… परिवार एकसंध होऊन राज्यात मुसंडी कशी मारता येईल या दृष्टीने सुनेत्रा पवार यांनी पावलं उचलावी. सुनेत्रा पवार यांना आता काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
























































