
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका लग्नसोहळ्यात प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. मात्र, त्यांच्या सोबत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी गोळीबारात जखमी झाले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला असून यात आरोपी अचानक पिस्तुल काढतो आणि पॉइंट ब्लँक रेंजवरून गोळी झाडताना दिसत आहे. या याप्रकरणी पोलिसांनी 63 वर्षीय कमलसिंह जमवाल याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी जम्मूमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याच्या मुलाचा विवाह सोहळा सुरू होता. या सोहळ्यासाठी फारुख अब्दुल्ला आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी उपस्थित होते. हा सोहळा आटोपल्यानंतर अब्दुल्ला बाहेर पडत असताना मागून आलेल्या कमलसिंह जमवालने त्यांच्यावर अगदी जवळून पिस्तुल रोखले आणि गोळी झाडली. नशिबाने ही गोळी अब्दुल्ला यांना लागली नाही. त्यांच्या झेड-प्लस सुरक्षा पथकाने आणि एनएसजी कमांडोजनी तत्काळ हालचाल करत आरोपीला जागीच पकडले आणि त्याचे पिस्तुल जप्त केले.
पोलीस तपासामध्ये आरोपी कमल सिंह जमवाल हा जम्मूचा रहिवासी असून त्याचे जुन्या शहरात काही गाळे आहेत. तो जागरण मंच नावाच्या एका अज्ञात संघटनेचा अध्यक्ष असल्याचा दावा करत आहे. हल्ल्याच्या वेळी आरोपी पूर्णपणे मद्याच्या नशेत होता. त्याने वापरलेले शस्त्र त्याचे परवानाधारक पिस्तुल होते. या घटनेत कोणताही दहशतवादी अँगल नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्यावर जम्मूत एका लग्न समारंभात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. pic.twitter.com/WmJQj0HW0q
— Saamana Online (@SaamanaOnline) March 12, 2026
दरम्यान, हल्लोखोरांनी नागरिकांनी पकडले आणि चांगला चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलीस चौकशी दरम्यान त्याने गेल्या 20 वर्षांपासून मला फारुख अब्दुल्लांना मारायचे होते, हा माझा वैयक्तिक अजेंडा होता, अशी धक्कादायक कबुली दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जम्मू पोलीस करत आहेत.
फारुख अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या नागरिकांनी पकडले; हल्लेखोराला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं #farooqabdullah pic.twitter.com/IyvsyBLkJR
— Saamana Online (@SaamanaOnline) March 12, 2026
दरम्यान, या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत असून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. अल्लाची कृपा म्हणून माझे वडील वाचले. पण झेड-प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीच्या इतक्या जवळ सशस्त्र माणूस पोहोचतोच कसा? ही सुरक्षेत मोठी कुचराई आहे, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनीही ही सुरक्षेतील त्रुटी असल्याचे म्हटले आहे. ज्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सल्लागार उपस्थित असतात, तिथे एखादी व्यक्ती बंदूक घेऊन आत कशी काय शिरू शकते, असा सवाल त्यांनी विचारला आहे.



























































