
बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्रा पवार यांनी स्विकारली असून रविवारी लोकभवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशात प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला. यानंतर संपूर्ण राजकारणात एकच खळबळ उडाली. दरम्यान, आता यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांच्या निवडीवर भाष्य केले. असा कोणताही निर्णय झालेला नाही. पियुष गोयल काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी म्हणाले.
माननीय सुनेत्रावहिनींच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा निर्णय संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या सहमतीने घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम सदस्यांनी आदरणीय अजितदादांनंतर सुनेत्रावहिनींचे नेतृत्व मान्य केले आहे.
आदरणीय अजितदादांनी घेतलेल्या निर्णयातून… pic.twitter.com/y36NyhHIvU
— Sunil Tatkare (@SunilTatkare) February 1, 2026
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हा पाटील असावा पटेल नाही’, म्हटले होते. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले, ‘राज ठाकरेंनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रित बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या भावना या लक्षात घेऊन निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भाजपने आमच्या पक्षाला नेहमी सहकार्य केले आहे. याबाबतीत कधीही त्यांनी आम्हाला सूचना केल्या नाहीत. यापूर्वीसुद्धा पक्षाचे मंत्रिमंडळ करताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भाजपने आम्हाला कधी काही सूचना केल्या नाहीत, असेही तटकरे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार असतील- माणिकराव कोकाटे
सुनेत्रा पवार सोडून दुसरा अध्यक्ष होणार नाही. सह्या करो किंवा ना करो आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांचा निर्णय झाला आहे. उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनी असतील आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री, विधीमंडळ पक्षाच्या नेत्या असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार असतील. यात शंका नाही, असे माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले.
























































