
पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामामुळे मंगळवार, 7 ऑक्टोबर ते गुरुवार, 9 ऑक्टोबर या कालावधीत शहर व पूर्व उपनगरातील काही विभागांमधील पाणीपुरवठय़ात दहा टक्के कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त तीन दिवसांच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करावा. पाणीकपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
या विभागांना बसणार फटका
शहर विभागातील ए, बी, ई, एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात संपूर्ण कार्यक्षेत्रात तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात संपूर्ण परिसरात 10 टक्के पाणीकपात लागू केली जाणार आहे. पूर्व उपनगरातील एल विभाग (कुर्ला पूर्व), एन विभागात विक्रोळी, घाटकोपर व घाटकोपर पूर्व, एस विभागात भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी पूर्व आणि टी विभागात मुलुंड पूर्व आणि पश्चिम क्षेत्रात दहा टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.