मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांत डिझेलऐवजी पाणी! भाजपच्या राज्यात काहीही शक्य आहे…

मध्य प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 इनोव्हा वाहनांच्या टाक्या रात्री फुल करण्यात आल्या. सर्व गाड्यांमध्ये डिझेल भरण्यात आले. त्यानंतर ताफा वेगाने पुढे निघून गेला. परंतु, काही अंतर कापल्यानंतर एकामागोमाग सर्व गाड्या बंद पडल्या. ताफ्यातील वाहने अचानक बंद पडल्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या घटनेनंतर संबंधित पेट्रोलपंप सील करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रतलाम जिह्यातील एका पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. मोहन यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी चक्क पाणी भरण्यात आले.

वाहनांमध्ये पाणी मिश्रीत डिझेल भरल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. ढोसी गावाजवळच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरून डिझेल भरून येत असताना एकामागोमाग एक गाड्या बंद पडू लागल्या. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर मॅकेनिकला बोलावण्यात आले. त्याने गाड्यांच्या टाक्यांमधून इंधन काढले असता त्यात पाणी सापडले.