
भिवंडी शहराच्या विविध भागात नागरी कामांचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. काही भागात ड्रेनेज लाईनला गळती लागल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईनची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज भिवंडी पालिकेच्या प्रभाग कार्यालयावर धडक देण्यात आली.
पावसाळा तोंडावर आलेला असतानाही शहरात अनेक भागात महापालिकेची कामे अपूर्ण आहेत. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दर्गा रोड ते सुतार आळी हा आरसीसी रोड गेले अनेक महिने बंद आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी जलवाहिनी फुटल्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना भिवंडी जिल्हाप्रमुख मनोज गगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आज प्रभाग क्रमांक चारच्या कार्यालयावर धडक दिली. या आंदोलनात महानगरप्रमुख अरुण पाटील, जिल्हा संघटक वैशाली मेस्त्री, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, नितेश दांडेकर, भाई वनगे, राजू पातकर, प्रशांत वसानी, बंटी गिरी, विजय कुंभार, नितीन काटवले, शंकर खामकर, अजय तेजे, विशाल आंबुरकर, शांताराम जाधव, मधुकर जाधव, अंजना पाटला, अनिल मच्छा, तारिक काजी, नहीम अन्सारी, करीमुल्ला अन्सारी, मुकीम अन्सारी, ललित राऊत, वसंत पुजारी, कुमार श्रीराम, सुधीर नांदुर्डीकर, शांताराम गायकवाड आदी सहभागी झाले होते.
… तर तीव्र आंदोलन छेडू !
शहरातील अनेक रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो. रहदारीच्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. हातगाड्या उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. महापालिका प्रशासनाने या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशी मागणी विभाग अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. जर पंधरा दिवसांत या समस्या सुटल्या नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडणार आहे, असा इशारा जिल्हाप्रमुख मनोज गगे यांनी दिला आहे.