भायखळ्यातील अपुऱ्या पाण्याचा प्रश्न सुटणार, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे भायखळा विधानसभेतील नागरिकांना भेडसावणाऱ्या अपुऱया पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

भायखळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या पाण्यासंदर्भातील समस्यांवर शिवसेना उपनेते व भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (जलकामे) यांच्या वरळी येथील हब इमारतीत बैठक पार पडली. या बैठकीत भायखळा येथील नागरिकांनी आपल्या अडचणी आमदार मनोज जामसुतकर आणि मनपा अधिकाऱयांसमोर मांडल्या. सदर समस्यांवर सविस्तर चर्चा होऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश मनोज जामसुतकर यांनी पालिका प्रशासनाला दिले.

या बैठकीला विधानसभा समन्वयक बबन गावकर, माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, शाखाप्रमुख काका चव्हाण, निंगप्पा चलवादी, सलीम शेख, शाखा समन्वयक शिल्पा म्हात्रे तसेच स्थानिक नागरिक व मनपा अधिकारी उपस्थित होते.