आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जगत आहोत, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या विधेयकावर राहुल गांधी यांची टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केंद्रशासित प्रदेश सरकार (दुरुस्ती) विधेयक, 2025 सादर केले. त्यावरून आपण मध्ययुगीन काळात जगत आहोत अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.तसेच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची एक कहाणी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीत एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले की, भाजपने मांडलेल्या नवीन विधेयकाबाबत खूप हालचाली सुरू आहेत. आपण पुन्हा मध्ययुगीन काळात जात आहोत, जिथे राजा हवं त्याला हटवू शकत होता. निवडून आलेल्या व्यक्ती म्हणजे काय, याची काहीच संकल्पना नाही. त्याला तुमचा चेहराच आवडला नाही, तर त्याच्या मागे ईडी लावली जाते. आणि मग लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या व्यक्तीला 30 दिवसांत संपवून टाकले जाते. आणि आपण हेही विसरू नये की आपण नवा उपराष्ट्रपती का निवडत आहोत. कालच मी कोणाशी तरी बोलत होतो आणि मी विचारलं, “की जुने उपराष्ट्रपती कुठे गेले?” ते गेले…”
तसेच ज्या दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्या दिवशी वेणुगोपालजींनी मला फोन केला आणि म्हणाले, “उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे मोठी गोष्ट आहे. तुमच्यापैकी काहींना ती माहिती असेल, काहींना नसेल, पण त्यामागे एक कहाणी आहे. आणि त्यानंतर आणखी एक कहाणी आहे की ते लपून का बसले आहेत. भारताचे उपराष्ट्रपती अशा परिस्थितीत का आहेत की जिथे ते एक शब्दही बोलू शकत नाहीत? अचानक, जे व्यक्ती राज्यसभेत नेहमी धडाकेबाज पद्धतीने बोलायचे, ते पूर्णपणे गप्प झाले आहेत. तर हा तो काळ आहे, ज्यात आपण जगत आहोत असेही राहुल गांधी म्हणाले.