
काँग्रेससोबत राहून मुंबई आणि महाराष्ट्रात लढायला सर्वजण तयार असतील तर या लढाईचेही आम्ही स्वागत करू, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच ‘राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही’ ही भूमिका अयोग्य, आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, काँग्रेसने घोषणा केली हे खरे आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का, हा प्रश्न आहे. जर त्यांनी ही युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांच्या आघाडीचे आम्ही स्वागत करू. प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद काँग्रेसला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे.
आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मुंबई मराठी माणसाचीच आहे हे पटवून देण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती. मुंबई महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला मिळवून देण्यात बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनाही मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात राहावी असे वाटणे स्वाभाविक आहे. वारंवार प्रकाश आंबेडकर यांनीही मुंबईवर मराठी माणसाचा हक्क असल्याचे मत व्यक्त केले आहे. काँग्रेससोबत राहून मुंबई आणि महाराष्ट्रात लढायला सर्वजण तयार असतील तर या लढाईचेही आम्ही स्वागत करू असे संजय राऊत म्हणाले.
आम्ही काँग्रेसला त्यांच्या हव्या असलेल्या जागा देण्यासाठी तयार होतो. काँग्रेसचे बालेकिल्ले असलेल्या जागांबाबत आमच्यात एकमत झाले होते. स्वतः राज ठाकरे यांचीही तीच भूमिका होती की सगळ्यांनी एकत्र राहावे. ‘राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही’ ही भूमिका योग्य नाही. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे असेही संजय राऊत म्हणाले.




























































