आपल्या शहराचे प्रश्न आम्ही विचारत राहणार, आता तुमची सुटका नाही! आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुर्ला येथे गेल्या २ महिन्यांपासून शिवकालीन पारंपारिक खेळांचे मैदान विकसित करण्याचे काम सुरू आहे. याबाबत गैरसमज परसवण्याचे काम सुरू आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गेरसमज परसवणाऱ्यांना चांगलेच ठणकावले आहे. आपल्या शहराचे प्रश्न आम्ही विचारत राहणार, आता तुमची सुटका नाही! असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अश्या महान नावाचा वापर करत, शिवकालीन पारंपारिक खेळाचं कारण पुढे करत आणि रोहिंग्याचा विषय काढत गैरसमज पसरवत तुम्ही तुमचा डाव लपवू पाहताय!!

जर तुमच्या कामात खोट नाहीये तर खालील गोष्टींची उत्तरं द्या!

• मैदान तर तयार आहे, विद्यार्थ्यांना आतून प्रवेशही करता येतोय, मग बाहेरुन वेगळ्या प्रवेशाची गरज काय?
• जरी बाहेरच्या लोकांना प्रवेश द्यायचा असेल, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही का?
• तुम्ही अर्बन फॉरेस्ट का उद्ध्वस्त करू इच्छिता?
• जर तुमच्या मनात खोट नव्हती तर JCB रात्री का पाठवले? दिवसा का नाही?
• आणि रोहिंगे घुसले कधी?!
गेली 11 वर्षं तुमचंच केंद्र सरकार आहे आणि राज्यातही तुम्हीच सत्तेवर आहात. सीमांच्या रक्षणाची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे.
तुम्ही हे आरोप केंद्र सरकार आणि मोदीजींवर करताय का?

आपल्या शहराचे प्रश्न आम्ही विचारत राहणार, तुम्हाला चुकीच्या गोष्टी करण्यापासून आम्ही रोखतच राहणार! तुम्ही किती खोटेपणा केलात, विषय भरकटवण्याचा, कांगावा करण्याचा प्रयत्न केला तरी तुमची सुटका नाही! असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.