हिमाचलमध्ये हवामान बिघडले, लाहौलमध्ये पुन्हा हिमवृष्टी सुरू; सफरचंद बागायतदार चिंतेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील हवामान पुन्हा बिघडले आहे. लाहौल-स्पितीमध्ये हिमवृष्टी आधीच सुरू झाली आहे. ३ आणि ४ एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशात पश्चिमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाल्यामुळे, हवामान विभागाने चंबा, कांग्रा, मंडी, कुल्लू आणि शिमला येथे मुसळधार गारपीट आणि ताशी ५०-६० किमी वेगाच्या वाऱ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. किन्नौर आणि लाहौल-स्पिती वगळता सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उंच ठिकाणी हिमवृष्टी आणि सखल ठिकाणी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तापमानात लक्षणीय घट अपेक्षित असून, त्यामुळे थंडी वाढेल. हिमाचल प्रदेशात ४-५ एप्रिलपर्यंत खराब हवामान अपेक्षित आहे. हवामान विभागाच्या मते, ८ एप्रिलपर्यंत पर्वतीय प्रदेशात खराब हवामान राहील. ५ ते ७ एप्रिलसाठी कोणताही इशारा जारी करण्यात आलेला नाही, परंतु संपूर्ण राज्यात खराब हवामान कायम राहील. ८ एप्रिलला आणखी एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे मुसळधार पाऊस आणि गारपिटीसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाऊस आणि हिमवृष्टीमुळे तापमान कमी होत आहे. एका आठवड्याच्या कालावधीत तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने कमी होऊ शकते. एप्रिल महिना सहसा खूप उबदार असला तरी, सततच्या पावसामुळे आणि हिमवृष्टीमुळे यावेळी थंडी कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या हवामानामुळे राज्यभरातील शेतकरी आणि बागायतदार त्रस्त आहेत. राज्याच्या उंच भागांमध्ये सध्या सफरचंदाला फुले येत आहेत. हवामान स्वच्छ असणे आवश्यक आहे, परंतु गारपिटीमुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे.