
हिंदुस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालने वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झंझावाती खेळी करताना पाहुण्या संघाची पळता भुई थोडी केली. त्याने 22 चौकारांच्या मदतीने 175 धावांची खेळी केली. युवा यशस्वीच्या खेळीने सर्वांनाच प्रभावित केले, त्यात वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा याचेही नाव जोडले गेले. ‘आमच्या गोलंदाजांची एवढी धुलाई करू नकोस,’ अशी मिश्कील टिप्पणी करत लारा याने जैसवालचे तोंडभरून कौतुक केले. यावर मी केवळ प्रयत्न करत असल्याचे यशस्वीने म्हटले. यशस्वीने हिंदुस्थानला मजबूत स्थितीत पोहोचवताना दुसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शनसोबत 193 धावांची भागीदारी नोंदवली. तर तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार शुभमन गिलसोबत 74 धावांची भागी केली, मात्र 175 धावांवर तो धावबाद झाला आणि द्विशतकाला मुकला. त्यानंतर गिलने मोर्चा सांभाळताना 2 षटकार आणि 16 चौकारांच्या मदतीने नाबाद 129 धावांची शतकी खेळी केली.