तिकीट तपासणीमध्ये पश्चिम रेल्वेचा नवा विक्रम; एकाच दिवसात तब्बल १.३९ कोटींची दंड वसुली

दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या लोकांमुळे लोकल ट्रेनची गर्दी आणखीन वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन अनेकजण विनातिकीट प्रवास करीत असल्याचे उघडकीस आले आहे. पश्चिम रेल्वेने उपनगरी मार्गावर तिकीट तपासणीमध्ये नवा विक्रम नोंदवत एकाच दिवसात तब्बल १.३९ कोटी रुपयांची दंड वसुली केली.

शाळांना दिवाळीची सुट्टी पडली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना घेऊन बाहेर फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या गर्दीच्या अनुषंगाने पश्चिम रेल्वे प्रशासनाने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. यादरम्यान शनिवारी नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. १८ ऑक्टोबर रोजी १७,३८३ विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून वसूल केलेल्या दंडाची रक्कम १.३९ कोटींवर गेली आहे. पश्चिम रेल्वेच्या इतिहासात एका दिवसातील कमाईचा हा सर्वोच्च आकडा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी १० नोव्हेंबर २०२३ रोजी १ कोटी २८ लाख रुपयांच्या दंड वसुलीचा विक्रम होता. तो विक्रम शनिवारच्या दंड वसुलीने मागे टाकला आहे. गेल्या काही महिन्यांत फुकट्या प्रवाशांमुळे पश्चिम रेल्वेच्या महसुलावर विपरित परिणाम झाला. तसेच त्या फुकट्या प्रवाशांमुळे वैध तिकीटधारक प्रवाशांनाही गैरसोईंना तोंड द्यावे लागले. त्यांच्या वाढत्या तक्रारीनंतर पश्चिम रेल्वेकडून ‘नमस्ते’ अभियान व इतर मोहिमांच्या माध्यमातून विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली जात आहे.

कमी मनुष्यबळ असूनही लक्षणीय कामगिरी
पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासनीसांचे (टीसी) मनुष्यबळ कमी आहे. त्यातही बरेच टीसी हे गर्दी मंजूर पदांच्या तुलनेत नियोजनाच्या ड्युटीवर आहेत. अशा परिस्थितीत कमी टीसींच्या पथकांनी विविध रेल्वे स्थानकांत कारवाई करून फुकट्यांकडून विक्रमी दंड वसुली केली.