
भावाचा मृत्यू झाल्याने संबंधित विधीसाठी गँगस्टर अबू सालेम याला आझमगड येथे चार दिवसांसाठी जायचे असून त्याच्या सोबत लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी राज्य सरकारने 17 लाख 76 हजार रुपये भरण्यास सांगितले आहे. मात्र केवळ एक लाख रुपयेच भरू शकतो, अशी भूमिका सालेमच्या वकिलांनी आज घेतल्यानंतर हायकोर्टाने वकिलांना फटकारले. घासाघीस कसली करताय? एस्कॉर्टस्चे ठरलेले पैसे द्यावेच लागतील, असे खडसावत याचिका तुम्ही मागे घेणार आहात की नाही ते कळवा. अन्यथा आम्हाला ती फेटाळावी लागेल, असे खडेबोल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने अबू सालेमचे वकीलांना सुनावले.
अबू सालेम याने 14 दिवसांचा पॅरोल देण्यात यावा अशी मागणी करत ऍड. फरहाना शहा यांच्यामार्फत हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे.




























































