
झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी सामन्यात विआन मुल्डरने नाबाद 367 धावांवर खेळत असताना डाव घोषित केला आणि ब्रायन लाराच्या कसोटी इतिहासातील 400 धावांच्या विश्वविक्रमाला मोडण्याची संधी गमावली. अशी संधी आयुष्यात एकदाच येते आणि ती गमावणे ही मुल्डरची मोठी चूक असल्याची टीका वेस्ट इंडीजचा झंझावाती फलंदाज ख्रिस गेलने केलीय.
ख्रिस गेल हा ब्रायन लाराचा माजी सहकारी होता. तो म्हणाला, ‘जर मला 400 धावा करण्याची संधी मिळाली असती तर मी ती नक्कीच साधली असती. अशा संधी वारंवार येत नसतात. तुम्ही कधी पुन्हा तिहेरी शतकाच्या जवळ जाणार याची काही खात्री नाही. त्यामुळे अशी संधी मिळाल्यावर तिचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा.’
मुल्डरने ब्रायन लाराच्या विक्रमाबद्दल आदर व्यक्त करत डाव घोषित केल्याचे सांगितले होते. गेलने त्याचा तो दृष्टिकोन काही अंशी मान्य केला, पण स्पष्टपणे टीकाही केली, ‘तो खूप उदार झाला. त्याने म्हटलं की, विक्रम लाराकडेच राहावा. पण मला वाटतं, तो त्या क्षणी गोंधळला होता. 367 वर असताना कोणताही फलंदाज आपोआप विक्रमी धावांकडे झेप घेईल. जर तुम्हाला दंतकथा व्हायचं असेल तर अशा गोष्टी कराव्याच लागतात. विक्रम हेच दंतकथेचे मोजमाप असते.’
27 वर्षीय मुल्डर आपल्या केवळ 21 व्या कसोटीत खेळत होता. झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱया क्रमांकावर खेळायला आलेल्या मुल्डरने 334 चेंडूंत 49 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 367 धावा केल्या. पहिल्या दिवसाअखेरीस तो 264 धावांवर होता आणि जेव्हा दक्षिण आफ्रिकेने डाव घोषित केला तेव्हा तो लाराच्या विक्रमाजवळ पोहोचला होता, मात्र संघ पुन्हा फलंदाजीला उतरला नाही.
गेल म्हणाला, ‘मुल्डरने ती संधी घ्यायला हवी होती. त्याने ते विक्रम गाठले असते की नाही ते वेगळं, पण 367 वर घोषित करणं, ही मोठी चूक होती. एकदा अशी संधी गेली की, ती पुन्हा येणार नाही. खरंच, मुल्डरने मोठी चूक केली.’ गेलने विरोधी संघाच्या दर्जाबद्दल होणाऱया चर्चेला केराची टोपली दाखवली. ‘कसोटी क्रिकेट हे कसोटी क्रिकेटच असतं. कधी कधी झिम्बाब्वेसारख्या संघाविरुद्धसुद्धा एक धाव करणे अवघड असते. कोणत्याही संघाविरुद्ध मिळवलेले शतक, द्विशतक, त्रिशतक किंवा 400 हे कसोटी क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. खेळाडूंनी हे लक्षात घ्यायला हवं.’