राजकारणापासून बाजूला राहणार नाही, निवृत्तीच्या चर्चेवर शरद पवार यांचे भाष्य

किती निवडणुका लढायच्या, कुठेतरी थांबले पाहिजे, या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानानंतर त्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाल्या. त्या चर्चांवर त्यांनी आज भाष्य करताना आपण राजकारणापासून बाजूला राहणार नाही, शक्य असेल तोपर्यंत राजकारण आणि समाजकारणात सक्रीय राहू, असे ते म्हणाले.

शरद पवार यांची एका वृत्तवाहिनीवर आज मुलाखत झाली. त्यावेळी त्यांना निवृत्तीच्या चर्चांबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, निवडणुकीबाबत आपण केलेले वक्तव्य हे आपल्या कुटुंबाशी संबंधित होते. मी 25-30 वर्षे राजकारण केल्यानंतर पुढच्या 25-30 वर्षांसाठी नवी पिढी तयार करावी, अशी त्यामागची इच्छा होती.

यापुढे निवडणूक लढणार नाही असे मी म्हटले ते माझ्यापुरते होते. 2014पासून मी निवडणूक लढलो नाही. राज्यसभेवर गेलो. त्यानंतर माझ्या मतदारसंघात सुप्रिया चार वेळा उभी राहिली. म्हणजे थेट निवडणुकीला उभे रहायचे नाही, असे मी ठरवले आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शेतकऱयांचे मरण हेच सरकारचे धोरण

सध्या शेतमालाचे भाव पडले आहेत. शासन तेलाची व कापसाच्या गाठीची आवक करीत असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मरण हेच सरकारचे धोरण बनले असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी सेलू येथील जाहीर सभेत बोलतांना केले. राज्यात महाविकास आघाडीचे शासन जर सत्तेत आले तर महाराष्ट्राचा आपण चेहरामोहरा बदलू, असे ते म्हणाले.