
महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रभागरचनेच्या प्रक्रियेत भाजपचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महापालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभागरचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेत भाजपचा हस्तक्षेप चिंतेची बाब आहे. आपल्या पक्षासाठी सोयीचे ठरतील अशा प्रभागांची रचना करणे, राजकीय फायद्यासाठी शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रवृत्त करणे, अशा अनेक मार्गांनी भाजप सक्रिय झाला असून, यास महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांना सहकार्य करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
या पाश्र्वभूमीवीर महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. प्रभागरचनेच्या प्रक्रियेत वेळीच सुधारणा न केल्यास न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिला. याप्रसंगी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संघटक वसंत मोरे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार बापू पठारे, शिवसेनेचे महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, कमल व्यवहारे, माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, सचिन दोडके, सुनील माने, किशोर कांबळे, सुजित यादव, आसिफ शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरविकास विभागाला प्रारूप सादर, आयुक्त म्हणताहेत संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना नगरविकास विभागाला सादर करण्यात आली. समाविष्ट गावे, वाढलेली लोकसंख्या आणि वाढलेल्या मतदारसंख्येमुळे प्रभागांच्या आकारामध्ये बदल झाला आहे. प्रारूप प्रभागरचना पारदर्शकपणे तयार केली असल्याचा दावा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने प्रभागरचनेचे आदेश दिले होते. त्यानुसार चार सदस्यीय प्रभाग प्रणाली राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या अनुषंगाने महापालिकांना वेळापत्रकही देण्यात आले होते. महापालिकेने ११ जूनपासून प्रारूप प्रभागरचना आराखड्याचे काम सुरू केले. शासनाच्या नगरविकास विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार महापालिकांनी प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे काम केले आहे. पुणे महापालिकेनेही प्रारूप प्रभागरचना तयार करून सोमवारी नगरविकास विभागाला सादर केली आहे. नगरविकास विभाग ९ ऑगस्टला ही प्रारूप रचना निवडणूक आयुक्तांकडे पाठविणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, २०१७च्या प्रभाग रचनेनुसारच साधारणपणे प्रभागरचना करण्यात आली आहे. मात्र, गावांच्या समावेशामुळे काहीसा बदल होणार आहे. २०१७च्या निवडणुकीप्रमाणेच अँटी क्लॉक वाईज केले आहे. चार सदस्यीय प्रभाग असल्याने २०११ च्याच लोकसंख्येनुसार प्रभागरचना २०१७प्रमाणेच करण्यात आली आहे. मात्र, २०१७ नंतर महापालिकेत ३२ गावांचा समावेश झाला आहे. लोकसंख्येतही चार लाखांनी वाढ झाली आहे. यामुळे प्रभागांच्या आकारात बदल झाले आहेत. महापालिकेने पारदर्शकपणे प्रारूप प्रभागरचनेचे काम केल्याचा दावाही त्यांनी केला.