
शासकीय कामासाठी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या एका महिलेसोबत असभ्य वागणाऱ्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून महिलेशी अरेरावी करणाऱ्याविरोधा संताप व्यक्त होत आहे.
चंद्रपूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्याची महिलेशी अरेरावी; सर्वत्र संताप व्यक्त pic.twitter.com/6UYT7REYHU
— Saamana Online (@SaamanaOnline) February 14, 2026
प्रिया झामरे या महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यावर प्रतिलिपीवर आवक जावक विभागात सही शिक्का घेण्यासाठी त्या गेल्या. कागदावर शिक्का ठळकपणे आला नसल्याने तो परत मारून देण्याची विनंती या महिलेने केली असता संबंधित कर्मचाऱ्याने अरेरावी केली. तिच्या अंगावर तो धावून गेला. कार्यालयात बसताना ओळखपत्र गळ्यात आवश्यक असताना त्याने ते खिशात ठेवले होते. या महिलेने ते गळ्यात घालण्याची वारंवार विनंती केली, पण त्याने तसे न करता टेबलवर ठेवले. हा सगळा प्रकार एका व्हिडिओत दिसत असून, तो समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचारी सर्वसाधारण लोकांशी कसे वागतात, हे या व्हिडिओतून समोर आले. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.




























































