
प्रवासी महिलेवर रिक्षाचालकाने धारदार चाकूने वार करून तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये समोर आली आहे. लूट केल्यानंतर या रिक्षाचालकाने महिलेला रस्त्याच्या बाजूला ढकलून घटनास्थळावरून पोबारा केला. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चार पथके तयार करून पनवेल शहरासह आजूबाजूचा परिसर पिंजून काढला व ४८ तासांत अक्षय बागडे (२७, रा. करंजाडे) याच्या मुसक्या आवळल्या असून कर्ज फेडण्यासाठी त्याने ही लुटमार केल्याची कबुली दिली आहे.
या घटनेमुळे माता-भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर आल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. संगीता भोईर या अक्षय याच्या रिक्षाने घरी जाण्यास निघाल्या होत्या. करंजाडे आर-०४ मधली सत्य ट्रायडंट बिल्डिगच्या समोर असलेल्या सर्व्हिस रोडवर अक्षयने अचानक रिक्षा थांबवली. गाडी बिघडल्याचे कारण सांगून तो खाली उतरला आणि काही न कळायच्या आतच जवळ असलेल्या चाकूने संगीता भोईर यांच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर त्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संगीता यांना तसेच रिक्षातून बाहेर फेकून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले तसेच मोबाईल, रोख रक्कम घेऊन पोबारा केला. जखमी अवस्थेतील संगीता भोईर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितल्या. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली चार पोलीस पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.
पोलीस तपास करत असतानाच एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ऑटोरिक्षाचे शेवटच्या चार क्रमांकाची माहिती यंत्रणांना दिली. मात्र रिक्षाचा सिरीज, कोड त्याला लक्षात नव्हता. त्यानंतर पोलिसांनी या आकड्यांच्या माहितीवरून रिक्षाचालकांची उलटतपासणी सुरू करून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याआधारे अक्षयला बेड्या ठोकण्यात आल्या. या पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक शाकीर पटेल, अभिजित अभंग, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्याचवेळी गुन्हे शाखाही समांतर तपास करीत होती. या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास तसेच काही रिक्षाचालकांची चौकशी करून माहिती गोळा केली. त्याआधारे अक्षय बागडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
























































