
पुणे जिह्यातील एक तरुणी पोलीस दलात करिअर करण्यासाठी श्रीगोंदा येथील रनर्स क्लब ऍकॅडमीमध्ये भरती झाली. मात्र, ऍकॅडमी चालकाने तिच्याशी जवळीक साधून वारंवार अत्याचार केले. त्यानंतर जबरदस्तीने गर्भपात केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी ऍकॅडमी चालकावर गुन्हा दाखल केला.
जावेद शेख (रा. श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल झालेल्या ऍकॅडमी चालकाचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील एक तरुणी उच्च शिक्षणासाठी श्रीगोंदा येथे आली होती. पोलीस भरतीमध्ये करिअर घडवायचे असल्यामुळे तिने शिक्षणाबरोबर रनर्स क्लब ऍकॅडमी जॉइन केली. मात्र, डिसेंबर 2024 मध्ये पोलीस भरती ग्राउंडची तयारी करत असताना तिचा पाय लचकला. याबाबत तिने ऍकॅडमी चालक जावेद शेख यांना विचारणा केली असता, त्याने दुसऱ्या दिवशी पहाटे ग्राउंडवर बोलावून घेतले. यावेळी पाय ट्रेचिंग करण्याच्या बहाण्याने पीडितेशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केले.
याबाबत कोणालाही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने तरुणीवर ग्राउंडवर व त्याच्या घरी नेऊन अत्याचार केले. जानेवारी 2025 मध्ये फिर्यादीच्या पोटात अचानक दुखू लागल्यानंतर ती उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गेली असता, ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी तिने आरोपी जावेद शेख यास गर्भवती असल्याचे सांगितले. जावेद व त्याचा मित्र तरुणीच्या रूमवर जाऊन तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्याने तरुणीचा गर्भपात झाला.
दरम्यान, पीडित तरुणीने जावेद शेख यास लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने साफ नकार देत मला ‘गजवा-ए-हिंद’ असे म्हणाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हिंदू समाजाचे पोलिसांना निवेदन
n या घटनेवर संताप व्यक्त करीत बजरंग दल, शिवप्रतिष्ठान आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीगोंदा पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी कालदास कोथंबिरे, प्रतीक पाचपुते, विकास भोपळे, प्रतीक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते हजर होते.





























































