मरणाने केली सुटका… जगण्याने छळले होते! कुटुंबाने नाकारल्याने साठ वर्षे मनोरुग्णालयातच, 96 व्या वर्षी मृत्यू, पण कोणीही फिरकलेच नाही

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते… मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.. या कविवर्य सुरेश भट यांच्या गझलेची प्रचिती ठाण्यातील मनोरुग्णालयात आली. कुटुंबाने नाकारलेली थोडीथोडकी नव्हे तर तब्बल साठ वर्षे एका महिलेने मनोरुग्णालयामध्ये आपले जीवन कंठले. पण ना रक्ताच्या नात्यातील कोणी फिरकले, ना विचारपूस केली. अखेर वयाच्या 96 व्या वर्षी या आजीचा रुग्णालयातच मृत्यु झाला.

एखाद्या चित्रपटातील प्रसंगालाही लाजवेल अशा अनेक घडामोडी या महिलेच्या आयुष्यात घडल्या. 1965 मध्ये कल्याण न्यायालयाच्या आदेशानुसार तिला ठाण्याच्या मनोरुग्णालयात दाखल केले. पण त्यानंतर कुटुंबातील आई, भाऊ किंवा कोणत्याही नातेवाईकाने रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली नाही. तिला अक्षरशः वाऱ्यावर सोडले. वर्षामागून वर्षे उलटली मनोरुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नानंतर भावाशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने थेट सांगितले की, मी बहिणीला मनोरुग्णालयात दाखल केलेले नाही, त्यामुळे तिला घेऊन जाणार नाही.

तरुणपणी मनोरुग्णालयात आलेल्या आजींना 2008 पासून रक्तदाब, हायपर थायरॉईड, अंधत्व अशा असंख्य आजारांनी गाठले. नातेवाईकांनी तिला नाकारले तरी डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांनी आजींना ‘आपले’ मानले. घरच्या माणसाप्रमाणे मोठ्या आपुल कीने तिची सुश्रुषा केली. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्यापासून ते डॉक्टर ऋचा जोशी, शमा राठोड, शोभना चव्हाण, रीना वासुदेव, सुमन गोरडे, प्रमिला भिकड आदींनी उपचार व सेवेत कोणतीही कमतरता ठेवली नाही. अखेर 96 व्या वर्षी आजीबाईंनी अखेरचा श्वास घेतला.

पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार

‘त्या’ आजीबाईंची प्रकृती खालावली असून तिला किमान भेटायला तरी या, असे मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांनी भावाला कळवले. मात्र मयूर भावाने तुम्ही तिचे देहदान करा किंवा आणखी काहीही करा, असे सांगितले. आईने सोडले, भावाने नाकारले पण मनोरुग्णालयाने तिला साठ वर्षे ममतेने सांभाळले. वागळे इस्टेट पोलिसांच्या मदतीने आजींवर अंत्यसंस्कार केले. तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.