
<<< प्रज्ञा सदावर्ते >>>
‘चार वर्षांपूर्वी सर्वेक्षणासाठी वस्तीवर गेले आणि आठवीनंतर शिक्षण सोडावं लागलेल्या माझ्याच हुशार विद्यार्थिनींच्या हुंदक्यांनी प्रचंड अस्वस्थ झाले. त्या बालविवाहाला बळी पडू नयेत, शिकून मोठ्या व्हाव्यात म्हणून शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारले…’ हे सांगत होत्या नाशिक महापालिका शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव-शिंदे. त्यांच्या याच उपक्रमाने कर्मदान चळवळीचे रूप घेतले, या माध्यमातून 130 मुलींचे शिक्षण पुन्हा सुरू झाले, त्या डॉक्टर, इंजिनीअर, सीए, शिक्षिका होण्याच्या स्वप्नांच्या दिशेने झेपावल्या आहेत.
राज्यात पटसंख्येअभावी महापालिका शाळा बंद पडत असताना नाशिकच्या आनंदवली गावातील महापालिका शाळा क्रमांक 18 चे चित्र थक्कं करणारे आहे. गोरगरीब कुटुंबातील मुले इथे शिकत असून, पहिली ते आठवीची पटसंख्या 800 इतकी आहे. कोरोना काळात कुंदा बच्छाव मुलांपर्यंत घरपोहच पुस्तके देत होत्या, याच दरम्यान परिस्थितीमुळे हतबल आई-वडिलांनी मुलींचे शिक्षणच थांबवले.
नकळत्या वयातील लग्नामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, या विचारानेच त्या अस्वस्थ झाल्या आणि गीतांजलीसह तिघींच्या पालकांचे मन वळवून शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली. तुम्ही फक्त मुलींना शिकू द्या, अशी विनंती केली, प्रसंगी समुपदेशकाची भूमिकाही बजावली. सन 2021 मध्ये सहशिक्षिका वैशाली भामरे यांच्या जोडीने ‘कर्मदान चळवळ’ उभी केली, तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे, प्रशांत पाटील यांच्यासह अधिकारी, दानशूरांच्या मदतीने हा परिवार विस्तारत गेला.
आज शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा आलेल्या मुलींची संख्या 130 आहे. 13 मुली नववीत, 11 जणी दहावीत, अकरावी आणि बारावीत 27 मुली शिकताहेत. चौघींचे अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण सुरू आहे. एक मुलगी डॉक्टर होईल, तर तिघी स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. या कार्याबद्दल बच्छाव यांना ‘नॅशनल इनोव्हेटिव्ह टीचर’, राज्य शासनाचा ‘आदर्श शिक्षिका’ यासह शंभराहून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कालपर्यंत मी एकच कुंदा होते, आज शंभराहून जास्त ‘कुंदा’ घडल्या आहेत. ज्या आपलं थांबलेलं शिक्षण नव्या उमेदीने पूर्ण करता-करता अनेकांना आधार देऊ लागल्या आहेत. एकीनं दुसरीला मदतीचा हात द्यायचा, दुसरीनं तिसऱ्या लेकीच्या स्वप्नांना बळ द्यायचं, असं करता-करता प्रत्येकीला आपलं आभाळ गवसेल, असा विश्वास कुंदा बच्छाव व्यक्त करतात.
‘विमान’वारी आणि ‘इस्रो’ भेट
या शाळेतील मुलांना एकदा नव्हे, दोनदा विमानवारीचा आनंद मिळाला. आधी मुंबईत विधानभवनाला आणि यावर्षी विज्ञान दिनी ‘इस्रो’ला भेट दिली. हे दोन्ही अनुभव अविस्मरणीय होते. राज्यात प्रथमच महापालिका शाळेने हे उपक्रम राबवले आणि आनंदवलीचे नाव कानोकानी पोहोचले.
चार भिंतीतलं शिकवणं पुरेसं नाही
सटाणा तालुक्यातील लखमापूरच्या शेतकरी कुटुंबात कुंदा बच्छाव यांचा जन्म झाला. हुशार असूनही गरिबीमुळे दहावीनंतरच वडिलांनी पुढच्या शिक्षणासाठी नकार दिला तेव्हा खचले होते. मात्र, शिक्षकांच्या आधाराने आयुष्य बदलले. शिक्षिका म्हणून चार भिंतीत शिकवणं पुरेसं नाही. प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या मुलींना शिक्षण मिळवून द्यायचं, हे स्वानुभवातून शिकले आणि वीस वर्षे कृतीत उतरवत आहे.