चीनने रोखला हिंदुस्थानचा विजयरथ, आता अंतिम फेरीत गाठण्यासाठी जपानविरुद्ध विजय आवश्यक

यजमान चीनने महिला हॉकी आशिया चषक स्पर्धेत अखेर गुरुवारी हिंदुस्थानचा विजयरथ रोखला. हिंदुस्थानी महिलांना या लढतीत 1-4 असा पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानसाठी मुमताज खान (38व्या मिनिटाला) हिने एकमेव गोल केला. चीनकडून झू मेरॉन्ग (4थ्या, 56व्या मिनिटाला), चेन यांग (31व्या मिनिटाला) आणि तान जिनझुआंग (47व्या मिनिटाला) यांनी गोल केले.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी जोरदार हल्ले चढवले. चौथ्या मिनिटाला चीनने आघाडी घेतली. झू मेरॉन्ग हिने हिंदुस्थानची बचावफळी भेदून भन्नाट गोल केला. हिंदुस्थानला 10व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोल साधता आला नाही. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमण करत अनेक संधी निर्माण केल्या; पण गोल मात्र झाला नाही. मध्यंतरापूर्वीच्या शेवटच्या पाच मिनिटांत हिंदुस्थानने चेंडूवर नियंत्रण ठेवून दबाव वाढवला. 27व्या मिनिटाला मिळालेला दुसरा पेनल्टी कॉर्नरही वाया गेल्याने मध्यंतरापर्यंत बरोबरी साधण्याची संधी हिंदुस्थानने गमावली.

तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच हिंदुस्थानकडून बचावात चूक झाली आणि चेन यांगने साध्या फटक्याने चीनला दुसरा गोल करून दिला. काही वेळाने चीनला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र त्यावर गोल झाला नाही. 38व्या मिनिटाला हिंदुस्थानसाठी मुमताज खानने अप्रतिम मैदानी गोल केला. लालरेमसियामीकडून मिळालेला पास तिने वर्तुळाच्या काठावरून पकडला आणि बॅकहॅण्डने जोरदार फटका मारत गोल साधला. यानंतर लगेच झू मेरॉन्गने जवळून फटका मारला, पण हिंदुस्थानी गोलरक्षक बिचू देवीने उत्कृष्ट बचाव केला. शेवटच्या सत्रात चीनने जोरदार सुरुवात करत आघाडी वाढवली. 47 व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर तान जिनझुआंगने डिफ्लेक्शनवर गोलमध्ये रूपांतरित केला. त्यानंतर 56 व्या मिनिटाला झू मेरॉन्गने आणखी एक मैदानी गोल करत चीनचा विजय पक्का केला आणि संघाला अंतिम फेरीत नेले.

..तर हिंदुस्थान-चीन अंतिम झुंज

हिंदुस्थानचा पुढील सामना 12 सप्टेंबरला जपानविरुद्ध होणार असून, अंतिम फेरी गाठण्यासाठी विजय मिळवणे अनिवार्य आहे. विजय मिळाल्यास हिंदुस्थानला किताबी लढतीत पुन्हा यजमान चीनचे आव्हान असेल.