ट्रम्प टॅरिफमुळे गालिचा उद्योग विस्कटला; उत्तर प्रदेशातील शेकडो कारागिरांचा रोजगार हिरावला

अमेरिकेने लादलेल्या भारीभक्कम टॅरिफमुळे उत्तर प्रदेशच्या भदोही मिर्झापूर येथील गालिचा (कार्पेट) उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. गालिचा तयार करणाऱ्या अनेक कारखान्यांना टाळे लागले आहे, तर काही ठिकाणी थोडेथोडके काम सुरू आहे.

अमेरिकेच्या बाजारात भदोहीच्या कार्पेट्सना मोठी मागणी असते. या उद्योगातून शेकडो कारागिरांना रोजगार मिळतो. मात्र ट्रम्प यांच्या टॅरिफचा जबरदस्त फटका या उद्योगाला बसला आहे. तब्बल 2500 कोटी रुपयांच्या कार्पेट्सच्या ऑर्डर लटकल्या आहेत. त्यामुळे साहजिकच कारखान्यांच्या मालकांनी कारागिरांनी कामावरून काढून टाकले आहे. तब्बल सात लाख लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.

हिंदुस्थानातून दरवर्षी 17 हजार कोटी रुपयांचे हाताने विणलेले गालिचे अमेरिका व अन्य देशांमध्ये निर्यात केले जातात. त्यापैकी 10 हजार 500 कोटी रुपयांचा माल एकट्या भदोही मिर्झापूर येथून जातो. भदोही मिर्झापूरचे 60 टक्के गालिचे म्हणजेच सहा ते साडेसहा हजार कोटी रुपयांचा माल अमेरिकेत निर्यात होतो.

भदोही मिर्झापूरचे पर्शियन स्टाईलचे हाताने बनवलेले गालिचे जगप्रसिद्ध आहेत. आपल्या देशात मात्र त्यांची जेमतेम 2 टक्के विक्री होते. हिंदुस्थानात हॉटेल, मॉल्स, थिएटरमध्ये बहुतांशी मशिनवर बनवलेले कार्पेट्स गालिचे वापरले जातात.

गालिचा, कार्पेट्सची सर्वाधिक मागणी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान असते. मे-जूनपासून त्याचे उत्पादन सुरू होते. मात्र ऑर्डर रद्द झाल्याने तयार असलेले गालिचे गोदामांमध्ये पडून आहेत. अनेक कारगिरांनी कर्ज काढून माल खरेदी केला होता. मात्र आता खरेदीदार मिळत नाहीत. भदोही मिर्झापूरच्या गोदामांमध्ये 700 कोटींचा माल पडून आहे. या सगळ्या परिस्थितीने पिचलेले कारागिरी अखेर दुसऱ्या कामधंद्याकडे वळले आहेत. काहींनी ऑटो रिक्षा चालवायला सुरुवात केलीय.