Ratnagiri News – चिपळूणमध्ये उत्साहात साजरा झाला जागतिक पांढरी काठी दिन

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने चिपळूण शहरात इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील रस्त्यावर दृष्टीहीन बांधवांनी पांढरी काठीसह रस्ता ओलांडण्याचे प्रात्यक्षिक सादर करून सामाजिक जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

या कार्यक्रमात दहा दृष्टीहीन दिव्यांगांचा सहभाग होता. “पांढरी काठी दिन हीच माझी वाणी, आम्ही नाही दुर्बळ आमची वेगळी कहाणी” अशा जोशपूर्ण घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी नॅब संस्थेचे अध्यक्ष निलेश भुरण, उपाध्यक्ष इब्राहिम दलवाई, कार्यवाह भरत नांदगावकर, संचालक ॲड. विवेक रेळेकर, प्रकल्प अधिकारी संदीप नलावडे, शिक्षण विस्तार अधिकारी सौरवी संतोष जाधव मॅडम, तसेच पोलीस कर्मचारी श्री. रसाळ, मयूर चव्हाण, वैभव फके, सुरज वरवाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी अंध बांधवांना मार्गदर्शन करत पांढऱ्या काठीचे आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व पटवून दिले. प्रकल्प अधिकारी संदीप नलावडे यांनी सांगितले की, “अंध काठी ही दृष्टिहीन दिव्यांगांसाठी जीवनसाथी आहे.” तर शिक्षण विस्तार अधिकारी सौरवी जाधव मॅडम यांनी म्हटले की, “अंधकाठी दिन हा दृष्टिहीन बांधवांसाठी प्रेरणादायी असून या काठीमुळे त्यांना आत्मविश्वास आणि स्वतंत्रपणे जगण्याची शक्ती मिळते.” या कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अंध बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास झळकत होता. पांढऱ्या काठीद्वारे समाजात समान हक्क, आत्मनिर्भरता आणि सन्मान यांचा संदेश देत जागतिक पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला.