वरळी हिट ऍण्ड रनप्रकरणी सरकार आज निवेदन करणार; वारंवार घडणाऱ्या घटना रोखा, विरोधकांची मागणी

राज्यात हिट अँड रनचे प्रकार वारंवार घडत आहेत. कायद्याला न जुमानता धनाढय़ांची मुले बेदरकारपणे गाडय़ा चालवून गरीबांचा बळी घेत आहेत आणि पसार होत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळे कायद्याची कोणतीही भिडभाड ठेवली जात नाही. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याचे निवेदन द्यावे, अशी मागणी शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या सूचनेखाली विधान परिषदेत केली. त्यावर सरकार या प्रकरणी उद्या सभागृहात निवेदन देईल, असे आश्वासन संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राज्यातील पुणे, नागपूर या मोठय़ा शहरांमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रमाणे मुंबईतही वरळी येथे घडली. एका राजकीय वरदहस्त असलेल्या धनाढय़ाच्या मुलाने दारू पिऊन आपल्या आलिशान गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत कोळी दांपत्यापैकी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गाडी चालवणाऱया दारूडय़ा मुलाने गाडीखाली आलेल्या या महिलेला सी लिंकपर्यंत फरफटत नेले. पुणे, मुंबई असो की, नागपूर यात गरीबांचा बळी जात असून अपघात करून पळणारे धनदांडगे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. वरळीतील हिट अँड रनचे प्रकरण गंभीर असून सरकारने या प्रकरणी निवेदन द्यावे, अशी जोरदार मागणी विरोधकांनी आज सभागृहात केली.

वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी आज स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. राज्यात हिट अँड रनची पुनरावृत्ती होत आहे. अशा प्रकरणात बडय़ा घरातील मुले रस्त्यावरील गोरगरिबांना किडयामुंगीसारखे आपल्या वाहनाखाली चिरडून टाकत आहेत. या गंभीर विषयावर चर्चा केली जावी, अशी सूचना स्थगन प्रस्तावाद्वारे सुनील शिंदे यांनी दिली.

निबंध लिहा आणि जामीन मिळवा, असा प्रकार होऊन नये!

वरळीतील अपघात प्रकरण खूप गंभीर आहे. या प्रकरणी आरोपीच्या वडील आणि इतरांना अटक झाली आहे. मात्र, दारू पिऊन गाडी चालवणारा आरोपी मोकाट आहे. दोन दिवस झाले तरी तो पोलिसांना सापडलेला नाही. जर तो तिस-या दिवशी सापडला आणि त्याची वैद्यकीय चाचणी केली तर त्यांच्या शरीरात दारूचा अंश सापडणार नाही. अशा वेळी पुन्हा पुण्यातील प्रकरणासारखे निबंध लिहा आणि जामीन मिळवा, असा प्रकार होऊ नये, यासाठी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निवेदन करावे, अशी मागणी विरोधकांच्यावतीने सचिन अहिर यांनी उपसभापतींकडे केली.