त्याला फाशी द्या! जयवंत वाडकरांचा संताप, पुतणीच्या आठवणींनी कंठ दाटला

वरळी दुर्घटनेत कावेरी नाखवा यांचा बळी गेला. कावेरी ही ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी होती. या घटनेवर वाडकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपीला फाशी दिली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

विकृत पद्धतीने कार चालवून माझ्या पुतणीचा जीव घेतला आहे. त्यामुळे आरोपीलाही तशीच शिक्षा झाली पाहिजे. गाडीसमोर साधा उंदीर आला तरी आपण गाडी थांबवतो. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. येथे ही व्यक्ती बोनेटवर पडली आणि तिला दीड-दोन किलोमीटर फरफटत नेले गेले ही किती भयंकर गोष्ट आहे. त्यानंतर हा आरोपी गाडी सोडून पळून गेला हे तर त्यापेक्षा गंभीर आहे, असे वाडकर म्हणाले. या आरोपींना दया दाखवू नका. सगळे पुरावे तुमच्याकडे आहेत. कोणालाही सोडू नका, असे नमूद करताना लोकांमध्ये अशा आरोपींची ट्रायल झाली व लोकांनीच न्याय करायचा म्हटले तर काय होईल याची कल्पना करा, असे सांगतानाच हिट अँड रनच्या वाढत्या घटनांवर वाडकर यांनी चिंता व्यक्त केली.

माझी सख्खी पुतणी मी गमावली. त्या मुलीने खूप कष्ट करून सगळं काही उभारलं होतं, असे सांगताना वाडकर यांचा कंठ दाटून आला.