‘आभाळमाया’, ‘वादळवाट’, ‘मन मानसी मानसी’ अशा अनेक मालिकांची शीर्षकगीते आपल्या लेखणीने अजरामर करणारे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचे आज भाईंदर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, अशी हळहळ व्यक्त होत आहे.
मंगेश कुलकर्णी हे केवळ उत्कृष्ट गीतकारच नव्हते तर अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पटकथा लेखनदेखील केले होते. शाहरुख खानचा गाजलेला ‘येस बॉस’, नाना पाटेकर यांचा ‘प्रहार’, ‘गुलाम ए मुस्तफा’, अक्षय कुमारचा ‘आवारा पागल दिवाना’ अशा अनेक चित्रपटांचे लेखन त्यांनी केले होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी विजया मेहता यांच्या अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्या भूमिका बऱयाच गाजल्या होत्या. दूरदर्शनवरील ‘लाईफलाईन’ या हिंदी मालिकेचे लिखाण त्यांनी केले होते. या मालिकेत त्यांनी अभिनयदेखील केला होता. नाना पाटेकर यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती.
बस प्रवासात सुचले होते गाणे
‘आभाळमाया…’ गाणं आठवलं की अनेकजण फ्लॅशबॅकमध्ये जातात. विशेष म्हणजे, बसमधून प्रवास करत असताना त्यांना हे गाणे सुचले होते. या गाण्याच्या ओळी त्यांनी चक्क बसच्या तिकिटावर लिहिल्या होत्या. आज इतक्या वर्षांनंतरही या गाण्याची जादू आजही कायम आहे.