
देशात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे आज देशाला या संकटाचा सामना करावा लागत असून सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बेंगळुरू येथे ‘एएनआय’शी (ANI) संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, “देशात गॅसची मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोक गॅससाठी लांबच लांब रांगेत उभे आहेत. ही सर्वांसाठीच मोठी डोकेदुखी ठरली आहे. सरकारने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, परंतु सरकार दुर्लक्ष करत आहे. कारण त्यांचे परराष्ट्र धोरण योग्य नाही. आज देश जो त्रास सोसत आहे, त्याला हेच चुकीचे धोरण जबाबदार आहे.”
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यावर बोलताना खरगे म्हणाले की, सरकारने या संघर्षाची पूर्वकल्पना असतानाही वेळीच पावले उचलली नाहीत.” दरम्यान, देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने काही ठिकाणी सिलिंडरसाठी ५,००० रुपयांपर्यंत दर आकारले जात असल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी राज्यसभेतही केला होता.

























































