
टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने आपल्या फलंदाजीची झलक वेळोवेळी दाखवून दिली आहे. आजच्या घडीला त्याचे जगभरात असंख्य चाहते आहेत. मुंबईत टेंटमध्ये झोपण्यापासून ते टीम इंडियाची जर्सी परिधान करेपर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादाई आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. वडिलांना पाहून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि भावाने माझ्यासाठी क्रिकेट खेळणं सोडून दिलं होतं, संघर्षाच्या काळातील एक आठवण यशस्वीने बोलून दाखवली.
आज तकच्या एका कार्यक्रमात बोलत असताना यशस्वीने आपल्या यशाच रहस्य सांगितलं आहे. तो म्हणाला की, “सुरुवातीला माझे वडील क्रिकट खेळायचे, त्यांना पाहूनच मी सुद्धा क्रिकेट खेळायला शिकलो. माझे आई-वडील नेहमीच सकारात्मक होते. माझ्या भावाने मला पाठिंबा दिला. त्याने माझ्यासाठी क्रिकेट खेळणं बंद केलं. सुरुवातीला मी मुंबईला गेलो तेव्हा तो तिथेच होता. तो आता संघार्षातून जात आहे. त्याने अलिकडेच त्रिपुराकडून खेळताना एक जबरदस्त अर्धशतक झळकावले. मी माझ्या कामगिरीबद्दल त्याच्याशी बोलतो. तो माझ्या गोष्टी समजून घेतो. तसेच आम्ही अनेकवेळा घरात असताना फिटनेसवर चर्चा करतो.” असं म्हणत यशस्वीने एक प्रकारे आपल्या भावाचे आभारही मानले आणि त्याला त्याच्या करिअरसाठी पाठिंबा दिला आहे.
यशस्वी जयस्वाल मुळ उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील सुरियावानचा रहिवासी आहे. त्याचे वडील भूपेंद्र जयस्वाल यांचे पेंटचे दुकान आहे. तसेच यशस्वीचा भाऊ तेजस्वी यादव सध्या त्रिपुरा संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. त्याने आतापर्यंच पाच प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्रिपुराचे प्रतिनिधीत्व केले आहे.



























































