यशवंतराव चव्हाण यांची पणती 11व्या वर्षी बनली लेखिका; अमायरा चव्हाणच्या ‘द ट्रेल डायरीज’चे 5 जुलैला प्रकाशन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या 11व्या वर्षी लेखिका बनली आहे. वाचनामुळे आपल्याला जगायचे भान मिळते, असे सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने ‘द ट्रेल डायरीज’ ही साहसकथा लिहून बालसाहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकले आहे. साहसी आणि कल्पनारम्य कथानक असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे.

अमायराची ‘द ट्रेल डायरीज’ ही कादंबरी पेंग्विन रॅण्डम हाऊसची सहसंस्था ‘पारट्रीच’ने प्रकाशित केली आहे. अमायराच्या कादंबरीतून नव्या पिढीच्या विचारांचे, स्वप्नांचे आणि कल्पनाशक्तीचे दर्शन घडणार आहे. प्रकाशन सोहळ्याला  माहिती-तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांची उपस्थिती असेल.