
अतिरिक्त पदभार स्वीकारल्यानंतर काही तासात तहसिल कार्यालयातील तरुण लिपिकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यवतमाळमध्ये घडली. अनिकेत अन्नमवाड असे मयत लिपिकाचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील तहसिल कार्यालयात ही घटना घडली. या घटनेमुळे यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
तहसिल कार्यालयात सह दुय्यम निबंधक यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात अनिकेत अन्नमवाड हे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. कार्यालयातील नियमित अधिकारी कामानिमित्त रजेवर होते. यामुळे अनिकेत अन्नमवाड यांच्या अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. अनिकेत यांनी चार्ज घेतल्यानंतर काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत वेदना होऊ लागल्या.
अनिकेत यांना तात्काळ आर्णी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करत त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अनिकेत यांच्या पत्नीची दहा दिवसांपूर्वीच दुसरी प्रसुती झाली होती. यामुळे ते सुट्टीवर होते. सुट्टीनंतर ड्युटी जॉईन केल्यानंतर त्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आणि त्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.