Yavatmal News – महिला बँकेच्या गुंतवणूकदारांच्या हितासाठी शिवसेना खासदार संजय देशमुख सरसावले

>>प्रसाद नायगावकर

बाबाजी दाते महिला बँकेच्या गुंतवणूकदारांच्या हितासाठी यवतमाळ वाशीम लोकसभेचे शिवसेना खासदार (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय देशमुख हे सरसावले आहेत. बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत बनावट कर्ज प्रकरण, कमी मूल्यांकन असणाऱ्या मालमत्तांचे वाढीव मूल्यांकन दाखवून मोठे कर्ज उचलून फसवणूक केल्याने बँक डबघाईस आली. तसेच ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले. या प्रकरणात विशेष लेखापरीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीवरून तब्बल 206 जणांवर अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खासदार संजय देशमुख यांनी बाबाजी दाते महिला बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण यांना पत्र लिहून 5 लाखाच्या वरती असलेल्या ठेवीदारांची रक्कम प्रथम प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना केली आहे. शिवाय याबाबत लेखी माहिती देण्यासही सांगितले आहे. या महिला बँकेत सुमारे 37 हजार ठेवीदारांचे सुमारे 185 कोटी रुपये पैसे अडकून आहेत.

परिवाराशी निगडित असलेली महिला अर्बन बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर 9 नोव्हेंबर 2022 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने सदर बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता. या बँकेत सुमारे अडीच अब्ज रुपयाचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. गुंतवणूकदारांच्या रेट्यानंतर या प्रकरणी विलंबाने का होईना गुन्हे नोंदविले गेले. पण गुन्हे नोंद होऊन 4 दिवस उलटल्यानंतरही गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. उलटपक्षी गुन्हेगार हे अद्यापही मोकाट फिरत आहेत. पण या प्रकरणी शिवसेना खासदार संजय देशमुख यांनी वैयक्तिक लक्ष घातल्याने कुठेतरी गुंतवणूकदारांना काबाडकष्टाने कमवून बँकेत ठेवलेल्या आपल्या ठेवी परत मिळतील आणि दोषींवर कारवाई होईल अशी  आशा पल्लवित झाली आहे.