
सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी तरुणाई नको ती स्टंटबाजी करते आणि संकट ओढवून घेते. अशीच नको ती स्टंटबाजी एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आली आहे. नागपंचमीदिवशी नाग गळ्यात घालून रील बनवणे एका तरुणला चांगलेच महागात पडले आहे. रील शूट करत असताना नागाने तरुणाच्या हाताला दंश केला. तरुणाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील औरेया येथे ही घटना उघडकीस आली आहे. नागपंचमीनिमित्त मंगळवारी एक गारुडी नाग घेऊन आला होता. गारुडी नागरिकांना नागाचे दर्शन देत होता. यावेळी अमित नामक तरुण तेथे आला. अमितने गारुडीकडून नाग घेतला आणि गळ्यात घालून नागासोबत रील शूट करत होता.
रील शूट करत असतानाच नागाने त्याच्या हाताला दंश केला. यानंतर त्याची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबीय आणि स्थानिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात नेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तरुणाची प्रकृती आता स्थिर आहे.