ढोलताशांचा गजर… गुलालाची उधळण… तरुणाईचा जल्लोष… गणरायांच्या आगमनाने लालबाग, परळ गजबजले!

youth-celebration-lalbaug-parel-bustle-as-ganaraya-arrives

गणेशोत्सवाला अवघे दोन आठवडे शिल्लक राहिल्याने रविवारी लालबाग, परळ परिसरात गणरायांच्या आगमनाचा प्रचंड उत्साह दिसला. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि तरुणाईच्या जल्लोषात मुंबई शहर आणि उपनगरांतील 50 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मंडपात दाखल झाले. आगमन सोहळ्यात हजारो गणेशभक्तांनी गर्दी केल्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. जागोजागी वाहतूककोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

रविवारी सकाळी काही वेळ पावसाचा जोर अधिक होता. त्या पावसातही गणेशभक्तांची पावले लालबाग, परळ परिसराकडे वळली होती. नंतर पावसाने उसंत घेतली आणि तरुणाईच्या उत्साहाला उधाण आल्याचे चित्र गणरायांच्या आगमन सोहळ्यात दिसले. दिवसभरात ‘मालवणीचा महाराजा’ ‘जोगेश्वरीचा राजा’, ‘ग्रँट रोडचा राजा’, ‘एल्फिन्स्टनचा राजा’, ‘ताडदेवचा राजा’, ‘मालाडचा विघ्नहर्ता’, ‘खेतवाडीचा चिंतामणी’, ‘शिवडी-माझगावचा राजा’,‘ परळचा महाराजा’, ‘करी रोडचा राजा’, ‘ परळचा लंबोदर’, ‘अंधेरीचा विघ्नहर्ता’, ‘घोडपदेवचा राजा’, ‘घाटकोपरचा राजाधिराज’ आदी 50 हून अधिक मंडळांचे बाप्पा कार्यशाळांमधून मंडपात दाखल झाले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

सलग तिन्ही रविवारी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळल्याने कायदा-सुव्यवस्था राखताना पोलिसांची प्रचंड दमछाक झाली. परळ वर्पशॉप, आयटीसी हॉटेल, भारतमाता, चिंचपोकळी, बकरी अड्डामार्गे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती रवाना होणार असल्याने या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

समन्वय समितीचे कार्यकर्तेही सक्रिय

गर्दीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. जागोजागी कार्यकर्ते उभे राहिले आणि संपूर्ण गर्दीवर नियंत्रण ठेवून भक्तांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांना पालिका प्रशासन आणि समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केल्यामुळे दिवसभर लालबाग, परळ परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला. गणेशभक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत लाडक्या बाप्पाची स्वारी मंडपापर्यंत सुखरूप आणण्यात यश मिळवले.

तेजस एक्प्रेसने बाप्पा निघाले सुरतला…

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या तेजस एक्प्रेसने गणपती बाप्पा सुरतला रवाना झाले. गौरव पाठक हे आपल्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करतात. ते गिरगावच्या राजन वेदक यांच्या कार्यशाळेतून मागील 15 वर्षे बाप्पा घेऊन जातात.

गिरगावमध्ये बाप्पाला बाळगोपाळांची सलामी

रविवारी गणरायाच्या आगमन सोहळय़ाचा उत्साह शहरभर ओसंडून वाहत होता. विविध सार्वजनिक मंडळांच्या आकर्षक, भव्य मूर्तींनी डोळय़ांचे पारणे फेडले. विठ्ठलाच्या रूपातील सुंदर, मनमोहक 26 फुटी भव्य मूर्तीचे आगमन पाहण्यासाठीही गणेशभक्तांनी गर्दी केली होती. या बाप्पाला गिरगाव-ठाकूरद्वार येथील प्रसिद्ध हौशी बालमित्र दहिकाला मंडळाच्या बाळगोपाळांनी सात थरांचा मानवी मनोरा रचून मानवंदना दिली.