मतचोरीविरोधात युवक काँग्रेसची मेट्रो, लोकलमध्ये जनजागृती

मतचोरीविरोधात युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेनमध्ये माहितीपत्रके वाटत निवडणूक आयोग व भाजपाच्या मतचोरीबाबत आज जनजागृती केली. मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर ते साकीनाका व अंधेरी ते गोरेगाव मार्गावर मेट्रो आणि लोकलमधून प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरूक नागरिकांनी या मतचोरीविरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा भ्रष्ट कारभार त्यांनी पुराव्यासह उघड करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांचा पर्दाफाश केला आहे. गांधी यांच्या संघर्षात युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी असून सर्वसामान्य जनतेत जाऊन मतचोरी या विषयाबाबत यापुढे सातत्याने जनजागृती करत राहू, असे यावेळी सांगण्यात आले.