
सोशल मीडियासाठी काहीतरी वेगळे आणि थ्रिलिंग व्हिडिओ बनवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. पूर्व दिल्लीतील न्यू अशोक नगर परिसरात एका 28 वर्षीय तरुणाने व्हिडिओ बनवताना स्वतःच्याच छातीवर लोडेड पिस्तूल ताणली आणि अचानक गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला. पवन कुमार असे मृत तरुणाचे नाव असून ही घटना 16 मार्च रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुमार हा दल्लूपुरा गावाचा रहिवासी होता. तो आपल्या चुलत भावाच्या, हिमांशूच्या परवानाधारक पिस्तुलासोबत व्हिडिओ बनवत होता. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पवन पिस्तूल हातात घेऊन स्टंट करत असताना हिमांशू त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. त्याचवेळी पिस्तूलमधून गोळी सुटली आणि पवन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वसुंधरा एन्क्लेव्ह येथील धर्मशिला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना हिमांशूचा मोबाईल फोन जप्त केला आहे. या फोनमध्ये संपूर्ण घटनेचे थरारक चित्रण कैद झाले आहे. व्हिडिओमध्ये पवन पिस्तूल हाताळताना दिसत असून हिमांशू त्याला तसे न करण्याच्या सूचना देतानाही ऐकू येत आहे. मात्र, क्षणात घडलेल्या या अपघाताने एका तरुणाचा बळी घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेच्या आणि Forensic Team ने या घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाल बहादूर शास्त्री रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी न्यू अशोक नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 105 आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































