
धबधब्यावर रील बनवणे एका 26 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. अंघोळीची रील बनवत असताना तोल जाऊन तरुण पाण्यात पडला. प्रवाहात वाहून जात असताना मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निष्फळ ठरला आणि तरुण 105 फुटावरुन खाली कोसळला. राजस्थानमधील चित्तोडगड येथे ही घटना घडली आहे. सोमवारी एका प्रसिद्ध धबधब्यावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला.
कन्हैयालाल बैरवा असे तरुणाचे नाव आहे. तो मित्रांसोबत बेगू येथील मेनल धबधब्यावर पिकनिकला गेला होता. यावेळी तरुण अंघोळीचा सेल्फी व्हिडिओ बनवत होता. मात्र सेल्फी घेताना तरुणाचा तोल जाऊन तो पाण्यात पडला.
तरुणाला पाण्यात पडलेले पाहून मित्राने आरडाओरडा केल्याने धबधब्यावरील अन्य तरुण धावत आले. तरुणाने धबधब्यावर लावलेली सुरक्षा साखळी पकडून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने साखळीवरील पकड निसटली आणि तो 105 फूट खाली कोसळला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक आणि नागरी संरक्षण दल कन्हैयालालच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.