ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांना यूट्यूब बंदी

ऑस्ट्रेलिया सरकारने मोठा निर्णय घेत 16 वर्षांखालील मुलांना यूट्यूबवर अकाऊंट्स बनवण्यास बंदी घातली आहे. नवा नियम 10 डिसेंबर 2025 पासून लागू होईल. ऑस्ट्रेलियात अशी बंदी यापूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू होती. त्यामध्ये आता यूट्यूबचा समावेश झाला आहे. यूट्यूबवर असलेल्या कीड्स अ‍ॅपला या नियमांतून सूट देण्यात आलेय.

मुलांना सोशल मीडियाच्या घातक प्रभावापासून वाचवण्यासाठी हा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारने घेतला आहे. अलीकडच्या एका सर्व्हेतून असे दिसून आलंय की, अलीकडे 2600 पैकी 40 टक्के मुलांनी यूट्यूबवर हानिकारक कंटेन्ट बघितला आहे. नव्या कायद्यानुसार मुले यूट्यूबवर स्वतःचे अकाऊंट बनवू शकत नाही. यूट्यूबवर लॉगआऊट होऊन व्हिडीओ बघू शकतात, मात्र स्वतःचे अकाऊंट बनवू शकत नाही. जर एखाद्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने या नियमाचे उल्लंघन केले तर त्याला अंदाजे 330 कोटी रुपयांपर्यंतचा दंड लागू शकतो.