
हिंदुस्थान क्रिकेटच्या इतिहासातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने आपल्या जीवनातील सर्वात भीषण संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2011 चा विश्वचषक जिंकवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या युवराजला त्यावेळी आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराने ग्रासले आहोत याची कल्पना होती, पण देशासाठी खेळण्याची जिद्द मोठी होती. विश्वचषकानंतर जेव्हा त्याची प्रकृती अधिक खालावली, तेव्हा डॉक्टरांनी दिलेला इशारा ऐकून तो हादरला होता. “तुझ्याकडे जगण्यासाठी फक्त तीन ते सहा महिने उरले आहेत,” असे डॉक्टरांनी त्याला स्पष्टपणे सांगितले होते. मायकल वॉनसोबतच्या पॉडकास्टदरम्यान युवराज सिंगने आपल्या संघर्षाला वाचा फोडली आहे.

युवराजच्या फुफ्फुसात आणि हृदयाच्या मधोमध ट्यूमर असल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. त्या काळात सौरव गांगुली निवृत्त झाला होता आणि युवराज सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कसोटी संघात आपली जागा पक्की करण्याच्या तयारीत होता. युवराज सांगतो की, “मी त्यावेळी इतका वेडा होतो की मी डॉक्टरांना म्हणालो, मी मेलो तरी चालेल पण मला खेळायचे आहे.” मात्र, डॉ. नितेश रोहतगी यांनी त्याला बजावले की, जर त्याने त्वरित केमोथेरपी सुरू केली नाही, तर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू ओढवू शकतो. या इशाऱ्यानंतरच त्याने उपचारांचा गांभीर्याने विचार केला.

उपचारांसाठी युवराज अमेरिकेला गेला, जिथे प्रख्यात सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. तो काळ मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. “जर मी क्रिकेट खेळलो नाही, तर मी कोण आहे? मी शून्य आहे,” या विचाराने त्याला नैराश्यात ढकलले होते. अशा वेळी अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर यांनी त्याची भेट घेतली. कुंबळेने त्याला क्रिकेटचे व्हिडीओ पाहण्यापासून रोखले आणि पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले, तर सचिनने इंग्लंडमध्ये जाऊन त्याची भेट घेत त्याला धीर दिला.

अखेर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर युवराजने कॅन्सरवर मात केली आणि केवळ सहा महिन्यांत टीम इंडियामध्ये पुनरागमन केले. 2012 च्या टी-20 विश्वचषकात त्याने आपल्या खेळाची झलक दाखवली. त्यानंतर स्वतःच्या फिटनेसवर अधिक काम करण्यासाठी त्याने झहीर खानसोबत फ्रान्समध्ये जाऊन दोन महिने कठोर प्रशिक्षण घेतले.


























































